हार्दिक पंड्याची वानखेडेवरही चाहत्यांनी केली बोलती बंद, नेमकं काय घडलं जाणून घ्या...

मुंबई : हार्दिक पंड्याला घरच्या मैदानातही चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. सामन्याचा टॉस होण्यापूर्वीच वानखेडेवर प्रेक्षकांनी हार्दिकला डिवण्यासाठी सुरुवात केली होती. पण यावेळी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी चाहत्यांना दम दिल्याचेही पाहायला मिळाले.

टॉससाठी हार्दिक पंड्या आणि राजस्थान रॉयव्सचा कर्णधार संजू सॅमसन हे दोघेही आले होते. त्यावेळी मांजरेकर हे समालोचन करत होते. टॉसचा निकाल सांगण्याची आणि दोन्ही कर्णधारांशी संवाद साधण्याची जबाबदारी यावेळी मांजरेकर यांच्यावर होती. मांजरेकर यांनी यावेळी म्हटले की, " मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यासाठी टाळ्या वाजवा." पण त्यावेळी चाहत्यांनी बु...बु... असा आवाज काढत हार्दिक पंड्याची हुर्यो उडवल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी मांजरेकर यांनी प्रेक्षकांना नीट वागा, असे सांगितले. त्यानंतर टॉस झाला. हा टॉस संजू सॅमसनने जिंकला आणि त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी संजूने आपण प्रथम गोलंदाजी का घेतली आणि संघात बदल काय केले, हे सांगितलं. त्यानंतर हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियन्सच्या संघाबाबत सांगायला पुढे आला.

हार्दिक पंड्या यावेळी टॉसनंतर मांजरेकर यांच्याशी संवाद साधण्यासाठी आला. त्यावेळी चाहत्यांनी मैदानात एकच आवाज केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे यावेळी हार्दिक पंड्या नेमकं काय बोलतो आहे, स्पष्टपणे ऐकायला येत नव्हते. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी यावेळी हार्दिक पंड्याची बोलतीच बंद केल्याचा अनुभव हा सर्वांनाच आला. वानखेडे हे मुंबईचे घरचे मैदान आहे, त्यामुळे हार्दिला इथे तरी चांगला प्रतिसाद मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण मुंबईच्या प्रेक्षकांनीही यावेळी हार्दिकला चिडवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हार्दिकला घरच्या मैदानातही विरोध असल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता हार्दिकला होत असलेला विरोध कमी कसा करायचा, याची चिंता संघालाही असेल.

मुंबई इंडियन्सचीही या सामन्यात वाईट सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाली. रोहित शर्मा, नमन धीर आणि डेव्हाल्ड ब्रेव्हिस यावेळी पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाल्याचे पाहायला मिळाले. ईशान किशन यावेळी १६ धावांवर बाद झाला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-01T15:13:56Z dg43tfdfdgfd