हार्दिक पंड्याने CSK च्या सामन्यात अखेरची ओव्हर का टाकली, जाणून घ्या कारण...

मुंबई : हार्दिक पंड्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात अखेरचे षटक टाकले आणि तो जोरदार ट्रोल झाला. कारण धोनीने या षटकात तीन षटकार लगावले आणि त्यामुळेच पंड्या टीकेचा धनी ठरला. पण तीन गोलंदाजांची षटके शिल्लक असताना हार्दिक पंड्यानेच का अखेरचे षटक टाकले, याचे कारण आता समोर आले आहे.

जसप्रीत बुमरहने यावेळी १९ वे षटक टाकले. त्यानंतर २०वे षटक कोण टाकणार, याची उत्सुकता सर्वांना होती. कारण मोहम्मद नबी आणि आकाश मढवाल यांचे प्रत्येकी एक षटक बाकी होते. श्रेयस गोपालने एक विकेट घेऊनही त्याला नंतर गोलंदाजी दिली नव्हती, त्यामुळे त्याची तीन षटके बाकी होती. रोमारिओ शेफर्ड याचीही दोन षटके बाकी होती. तब्बर चार गोलंदाजांचे पर्याय यावेळी हार्दिक पंड्याकडे उपलब्ध होते. पण हार्दिकने यावेळी या चौघांपैकी एकाही गोलंदाजाला २० वे षटक दिले नाही आणि तो स्वत: हे षटक टाकण्यासाठी आला.

हार्दिकने २० व्या षटकाच्या दुसऱ्या डॅरिल मिचेलला १७ धावांवर बाद केले. तोपर्यंत हार्दिकसाठी सारे काही आलबेल सुरु होते. पण त्यानंतर फलंदाजीला आला तो महेंद्रसिंग धोनी. पहिल्याच चेंडूवर धोनीने षटकार मारला, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरही षटकार मारला. त्यानंतरच्या चौथ्या चेंडूवर धोनीने दुहेरी धाव घेतली आणि त्यामुळे धोनीने हार्दिकच्या ४ चेंडूंमध्ये २० धावांची लूट केली. मुंबईचा या सामन्यात पराभवही २० धावांनीच झाला. त्यामुळे हार्दिकचे अखेरचे षटक मुंबई इंडियन्ससाठी भारी पडले. पण हार्दिकने हे शेवटचे षटक का टाकले, याचे कारणही आता समोर येत आहे.

आयपीएलनंतर टी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. हार्दिक फॉर्मात नसल्यामुळे त्याचा पत्ता कट होऊ शकतो, असे वाटत आहे. पण हार्दिकने एक गोलंदाज म्हणून जर ३-४ षटके गोलंदाजी केली तर त्याचा विचार टी-२० वर्ल्ड कपसाठी केला जाऊ शकतो, असे म्हटले जात होते. निवड समितीमधून अशी माहिती पुढे येत होती. त्यामुळेच हार्दिकने ही गोष्ट ओळखून चेन्नईच्या सामन्यातील अखेरचे षटक घेतले. कारण यापूर्वी हार्दिकने दोन षटकं टाकली होती आणि हे त्याचे तिसरे षटक ठरणार होते. हार्दिकने अखेरच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली. तोपर्यंत हार्दिकसाठी सर्व काही आलबेल सुरु होते. पण त्यानंतर धोनी फलंदाजीला आला आणि त्याने सर्व समीकरणच बदलून टाकले. धोनीच्या या खेळीमुळे आता हार्दिकच्या टी-२० वर्ल्ड कपच्या मार्गात मोठा अडथळा आल्याचे म्हटले जात आहे.

हार्दिकला आता टी-२० वर्ल्ड कपमध्ये कर्णधारपद मिळणार नाही, हे जवळपास निश्चित समजले जात आहे. पण हार्दिकला आता संघात संधी तरी मिळणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल. येत्या काही दिवसांतच वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर करण्यात येणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-16T13:37:31Z dg43tfdfdgfd