हार्दिकला जो चिडवणार त्याच्यावर कारवाई करणार, आयपीएलमध्ये यापुढे काय घडणार जाणून घ्या...

नवी दिल्ली : हार्दिक पंड्याला सध्याच्या घडीला सर्वाधिक ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियापेक्षा त्याला स्टेडियममध्ये जास्त ट्रोल केलं जात आहे. मुंबईचा पहिला सामना हा गुजरातमध्ये होता, त्यानंतर हैदाराबादला दुसरा सामना झाला. या दोन्ही सामन्यांत हार्दिकला स्टेडियममधील चाहत्यांनी जोरदार ट्रोल केले आहे. आता तिसरा सामना तर मुंबईच्या घरच्या मैदानात म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात जो हार्दिक पंड्याला चिडवणार त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. पण नेमकं करणार तरी काय, यावर सध्या चर्चा सुरु आहे.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढले आणि हार्दिककडे नेतृत्व सोपवले. चाहत्यांना ही गोष्ट सर्वात खटकली आहे. त्यामुळे चाहत्यांनी सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघाला ट्रोल केले. त्यानंतर आता मैदानात ते हार्दिकला ट्रोल करत आहेत. पण या ट्रोलला कोणतीही सीमा नसल्याचे पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीचा एवढा द्वेष का केला जात आहे, असा प्रश्न काही जणांना पडला आहे. पण दुसरीकडे मात्र हार्दिकला जोरदार ट्रोल केले जात आहे. पण आता हार्दिकला जे ट्रोल करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आता वानखेडेवर १ एप्रिलपासून होणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या सामन्यात ही खास गोष्ट पाहायला मिळणार आहे.

हार्दिकला जसे ट्रोल केले जात आहे, ते पाहून मुंबई इंडियन्सला आता चिंता वाटू लागली आहे. मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना हा वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था मुंबई इंडियन्सन ठेवणार असल्याचे समोर येत आहे. मुंबई क्रिकेट संघटनेकडून यावेळी मुंबई इंडियन्सचा संघ मदत मागणार आहे. यावेळी प्रेक्षकांमध्ये संघटनेचे काही पदाधिकारी असतील किंवा सुरक्षा रक्षक ठेवले जातील. जी व्यक्ती हार्दिक पंड्याला ट्रोल करतेय, असे दिसेल त्या व्यक्तीला थेट मैदानाबाहेर काढण्यात येणार आहे. त्यामुळे हार्दिकला जो भिडणार त्याला मैदानाबाहेर काढणार, असे धोरण आता मुंबई इंडियन्सच्या संघाने हाती घेतल्याचे समजत आहे. कारण या सर्व गोष्टींंमध्ये फक्त हार्दिकची नाही तर मुंबई इंडियन्सच्या संघाचीही बदनामी होत आहे. ही बदनामी थांबवण्यासाठी आता मुंबई इंडियन्स ही गोष्ट करणार असल्याचे समोर आले आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाला कर्णधार बदलण्याची किंमत मैदानात चुकवावी लागत असल्याचे आता म्हटले जात आहे. कारण या आयपीएलमध्ये मुंबईला पहिले दोन्ही सामने गमवावे लागले आहेत. दुसरीकडे हार्दिक आणि संघाला चाहते ट्रोल करत आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघासाठी हा सर्वात वेदनादायी काळ असल्याचे म्हटले जात आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-29T10:06:10Z dg43tfdfdgfd