हार्दिकवर भडकले सुनील गावस्कर, म्हणाले एवढं पण त्याला कळत नसेल तर...

मुंबई : भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर हे नेहमीच स्पष्ट बोलत असतात. पण मुंबई इंडियन्सचा पराभव त्यांच्याही जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच हा सामना जेव्हा संपला त्यानंतर गावस्कर हे हार्दिक पंड्यावर चांगलेच भडकले होते. हार्दिक हा एक कर्णधार आणि एक खेळाडू म्हणून कसा आहे, याबाबत त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

मुंबईने सामना गमावला आणि त्यानंतर आता हार्दिक टीकेचा धनी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. एक कर्णधार म्हणून आपल्याकडे कोणते गोलंदाज आहेत, त्यांची किती षटकं बाकी आहेत हेदेखील त्याला माहिती नसल्याचे समोर येत आहे. कारण हार्दिकने जेव्हा अखेरचे षटक टाकायला घेतले तेव्हा मुंबईच्या तीन गोलंदाजांची षटकं शिल्लक होती. अखेरच्या षटकात धोनी फक्त चार चेंडू खेळला आणि हार्दिकच्या या चार षटकांमध्येच सामना फिरल्याचे पाहाला मिळाले.

गावस्कर हार्दिकबाबत म्हणाले की, " एक षटकार ठीक आहे, कोणत्याही गोलंदाजाला एक षटकार पडतो. यामध्ये काहीच नवल नाही, पण षटकार गेल्यावर त्यानंतरचा चेंडूही त्याने लेंथवर टाकला. तुम्हाला ही गोष्ट माहिती असायला पाहिजे की, समोर कोणता फलंदाज आहे. त्यामुळे असा चेंडू हा त्याच्यासाठी आंदण ठरू शकतो. दोन षटकार मारल्यावर तुम्ही तिसरा चेंडू फुलटॉस टाकता. एखाद्या खेळाडूला एवढं तर समजायला पाहिजे. एक खेळाडू आणि एक कर्णधार म्हणून हार्दिक हा फारच साधारण वाटत आहे. माझ्यामते मुंबईने चेन्नईच्या संघाला १८५-१९० धावांपर्यंत रोखायला हवे होते."

हार्दिक हा मुंबई इंडियन्ससारख्या संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्व कौशल्य असायलाच हवं. पण ही साधी गोष्टही हार्दिककडे पाहायला मिळत नाही. त्यामुळेच गावस्कर यावेळी हार्दिकवर भडकले होते. कारण हार्दिककडून अतिशय साधारण कामगिरी झाल्याचे सर्वांनीच पाहिले. या चार चेंडूंसाठी हार्दिक हा सामन्याचा व्हिलन ठरला आहे.

हार्दिक पंड्याने खरंतर अखेरचे षटक हे स्वत: घ्यायलाच नको होते. कारण हार्दिककडे मोहम्मद नबी, आकाश मढवाल आणि श्रेयस गोपालसारखे गोलंदाज होते. पण तरीही हार्दिक हिरो बनायला गेला आणि व्हिलन ठरला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-15T11:06:20Z dg43tfdfdgfd