पहिल्या कसोटीतील पराभवाचे खापर रोहित शर्माने कोणाच्या डोक्यावर फोडले? पाहा नेमकं काय म्हणाला

हैदराबाद: पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध २८ धावांनी पराभव झाला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने तिसऱ्या दिवसापर्यंत सामन्यावर आपली पकड कायम ठेवली होती, मात्र ऑली पोपच्या दमदार फलंदाजीमुळे सामना टीम इंडियाच्या हातातून निसटताना दिसला. मालिकेतील पहिल्या कसोटीतील निराशाजनक पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहितने निराशा व्यक्त करत सांगितले की, २३० धावांचे लक्ष्य अवघड नव्हते, पण संघाकडून चूक झाली.

सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, "क्रिकेट चार दिवस चालते, त्यामुळे कुठे चूक झाली हे शोधणे कठीण आहे. १९० धावांच्या आघाडीसह, आम्ही विजयाच्या जवळ आहोत असे वाटले, परंतु ऑली पोपने इंग्लंडसाठी चमकदार खेळी खेळली, भारतीय भूमीवर मी परदेशी फलंदाजाकडून क्वचितच अशी सर्वोत्तम खेळी पाहिली असेल."

पुढे कर्णधार म्हणाला, "चौथ्या डावात २३० धावा करता आल्या असत्या, खेळपट्टीत तसे काही नव्हते. आम्ही धावा करण्यात यशस्वी ठरलो नाही. मी गोलंदाजीचे विश्लेषण केले, आम्ही योग्य ठिकाणी गोलंदाजी केली पण फलंदाजीत आम्ही कमकुवत होतो. सामन्यानंतर तुम्ही विचार करता की काय चांगले झाले आणि काय नाही. गोलंदाजांनी रणनिती चांगल्या प्रकारे अंमलात आणल्या, परंतु पोपची फलंदाजी मजबूत होती. ती एक अप्रतिम खेळी होती."

रोहित म्हणाला, "एक किंवा दोन गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणे अवघड आहे. एकूणच, एक संघ म्हणून आम्ही अपयशी ठरलो. त्यांच्या पहिल्या डावानंतर आणि आमच्या फलंदाजीनंतर आम्हाला वाटले की आम्ही विजयाच्या जवळ आहोत. पण आम्ही इतक्या धावा करताना चांगली कामगिरी केली नाही. मला सिराज आणि बुमराहने सामना पाचव्या दिवसापर्यंत पोहोचवायला हवा होता. फक्त २०-३० धावा काहीही होऊ शकले असते."

तो म्हणाला, "खालच्या फळीतील फलंदाजांनी खरोखरच चांगली लढत दिली आणि वरच्या फळीला दाखवून दिले की तुम्हालाही असेच लढावे लागेल. तुम्हाला अशी खेळी करावी लागेल, तुम्हाला अशाप्रकारे धावा कराव्या लागतील आणि माझ्या मते आम्ही अशी फलंदाजी केली नाही. आम्हाला काही जोखीम घ्यायला हवी होती, आम्ही फलंदाजी करताना रिस्क घेतली नाही, पण असं होतं असतं. मालिकेतील हा पहिलाच सामना आहे, मला आशा आहे की आम्ही यातून धडा घेऊ."

2024-01-29T04:19:58Z dg43tfdfdgfd