टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माकडून हार्दिक पंड्याला अल्टिमेटम; टी-२० वर्ल्डकप खेळायचा असेल तर घातली मोठी अट

नवी दिल्ली: आयपीएल २०२४चा हंगाम सर्व क्रिकेटपटूंसाठी महत्त्वाचा आहे. कारण हंगाम संपल्यानंतर एका आठवड्याच्या आत टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. त्यामुळेच प्रत्येक खेळाडू बेस्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. अशात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याच्या टी-२० वर्ल्डकप २०२४ मधील भारतीय संघातील निवडीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

आयपीएल सुरू असताना भारताचा कर्णधार रोहित शर्माची मुंबईत संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्यासोबत बैठक झाली. रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत टी-२० वर्ल्डकपसाठीचा मुख्य अजेंड्यावर चर्चा झाली. ही चर्चा प्रामुख्याने संघाच्या निवडीबाबत होती.

टी-२० वर्ल्डकप संघात हार्दिक पंड्याला घेण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तिघांनी मिळून असा निर्णय घेतला आहे की, आयपीएल २०२४ मध्ये हार्दिकला नियमीत गोलंदाजी करावी लागले. संघात स्थान मिळवण्याच्या शक्यतासाठी त्याची गोलंदाजीची कामगिरी महत्त्वाची असेल. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, या बैठकीत मुख्य चर्चा झाली ती टी-२० वर्ल्डकपसाठी जलद गोलंदाजीतील ऑलराउंडर निवडण्या संदर्भात होय. या वर्षीचा वर्ल्डकप जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे.

भारतीय संघात जलद गोलंदाज ऑलराउंडरची कमी आहे. भारतीय निवड समितीचे शिवम दुबेवर नजर आहे. त्याने फलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. अर्थात चेन्नई सुपर किंग्जने त्याच्याकडून अधिक गोलंदाजी करवून घेतली नाही. दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिकची गोलंदाजी चांगली झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या ६ सामन्यात त्याने ११ षटके टाकली असून ज्यात ३ विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनमी रेट १२ धावा प्रति ओव्हर इतका आहे.

भारतीय संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे की, पंड्याने गोलंदाजीत पुन्हा लय मिळवावी. त्याच्या गोलंदाजीमुळे संघातील प्लेइंग इलेव्हनचे संतुलन होण्यास मदत मिळते. तर त्याची बॅटिंग फलंदाजीची लाइनअप मजबूत करते. टी-२० वर्ल्डकपसाठी या महिन्याच्या अखेरीस अंतिम बैठक होण्याची शक्यता आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-17T09:54:04Z dg43tfdfdgfd