मराठमोळ्या शिलेदारांनी चेन्नईला जिंकवले, हैदराबादला नमवत सीएसके पुन्हा विजयाच्या मार्गावर

चेन्नईच्या : ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे या मराठमोळ्या खेळाडूंनी चेन्नईला विजय मिळवून दिला. ऋतुराजचे शतक हुकले असले तरी त्याच्या ९८ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना २१२ धावा करता आल्या. चेन्नईच्या २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाला तुषार देशपांडेने २७ धावांत चार धक्के दिले. त्यामुळे ऋतुराज आणि तुषार हे मराठमोळे खेळाडू या सामन्यात चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. हा सामना जिंकत चेन्नईच्या संघ हा विजयाच्या मार्गावर परतला आहे. गेल्या दोन सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला होता. पण आता ते विजयाच्या मार्गावर परतले आहेत.

चेन्नईच्या २१३ धावांचा पाठलाग करण्यासाठी हैदराबादचा संघ उतरला. पण तुषारने ट्रेव्हिस हेड (१३) आशुतोष शर्मा (१५) आणि अनमोलप्रीत सिंग (०) यांना एकामागून एक बाद केले. त्यामुळे चेन्नईने हैदराबादची ३ बाद ४० अशी अवस्था केली होती. त्यानंतर काही काळ एडन मार्करम आणि हेन्रीच क्लासिन हे काही काळ खेळपट्टीवर होते. त्यामुळे हैदराबादचा संघ विजय मिळवेल, अशी त्यांचा चाहत्यांना आशा होती. पण महीशा पथिराणाने या दोघांनाही बाद केले आणि चेन्नईच्या विजयाचा मार्ग मात्र मोकळा झाला.

हैदराबादने टॉस जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. हैदराबादने अजिंक्य राहणेला ९ धावांवर बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला खरा. पण त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिचेल यांनी दमदार फटकेबाजी करत संघाला चांगला धावसंख्या उभारून दिली. ऋतुराजने यावेळी फक्त २७ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. आपल्या या अर्धशतकात ऋतुराजने सात चौकार आणि एक षटकार लगावला होता. त्यानंतर थोड्याच वेळात मिचेलचे शतकही पाहायला मिळाले. मिचेलने यावेळी २९ चेंडूंत आपले अर्धशतक झळकावले, यामध्ये सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण त्याचवेळी जयदेव उनाडकटने मिचेलला बाद केले. मिचेलने यावेळी ३२ चेंडूंत ५२ धावा केल्या, जामध्ये सात चौकार आणि एक षटकार होता. ऋतुराजने गेल्या सामन्यात शतक झळकावले होते. पण यावेळी ऋतुराजने ५४ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ९८ धावांची खेळी साकारता आली. डॅरिल मिचेलनेही यावेळी अर्धशतक झळकावले. या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईच्या संघाने २० षटकांत ३ बाद २१२ अशी मजल मारता आली. तिथेच चेन्नईचा विजय अर्धा पक्का झाला होता.

चेन्नईने या सामन्यात घरच्या मैदानात दमदार विजय मिळवला. त्यामुळे आता यापुढे ते कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-28T18:36:33Z dg43tfdfdgfd