रोहित, हार्दिक नको! 'या' दोघांचा MI चा कॅप्टन म्हणून विचार करा; माजी क्रिकेटरचा सल्ला

Mumbai Indians Think About These 2 As Captains for IPL 2025: मुंबई इंडियन्सच्या संघासाठी यंदाचं आयपीएल हे एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे ठरलं आहे. मुंबई इंडियन्सचा संघ नेतृत्वबदलानंतर पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी राहिला असून आयपीएल 2024 मधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. 5 वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईच्या संघावर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली सर्वात आधी स्पर्धेबाहेर फेकलं जाण्याची नामुष्की ओढावली. या कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सचं संघ व्यवस्थापन मोठे निर्णय घेऊ शकतं अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच आता एका माजी क्रिकेटपटूने मुंबईच्या टीम मॅनेजमेंटला दोन खेळाडूंची नावं आयपीएल 2025 च्या कर्णधारपदासाठी सुचवली आहेत. 

परदेशी खेळाडूंनाही मुंबई कायम ठेवणार नाही

भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने 'क्रिकबझ'शी बोलताना मुंबईचा संघ माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विद्यमान कर्णधार हार्दिक पंड्या या दोघांनाही पुढील पर्वाआधी करारमुक्त करेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. याच चर्चेदरम्यान भारताचा मजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने सेहवागच्या या म्हणण्याशी सहमती दर्शवली आहे. तिवारी एवढ्यावरच थांबलेला नाही तर त्याने रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांना वगळण्याचा सल्ला देतानाच या दोघांच्या ऐवजी कोणचा कर्णधारपदासाठी विचार केला जाऊ शकतो हे सुद्धा सांगितलं आहे. सेहवागच्या मताशी सहमती दर्शवताना मनोज तिवारीने, "मलाही असं वाटतं की सूर्यकुमार यादव आणि बुमराह या दोघांनाच मुंबई इंडियन्स रिटेन करेल. या दोघांव्यतिरिक्त कोणाचाही विचार केला जाणार नाही अगदी परदेशी खेळाडूंचाही नाही. टीम डेव्हीडला नावाला साजेशी खेळी करता आली नाही. मी सुद्धा मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाला असा सल्ला देईल की सूर्यकुमार आणि बुमराहलाच कायम ठेवा," असं म्हटलं.

या दोघांचा व्हावा कर्णधार म्हणून विचार

तिवारी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने सूर्यकुमार किंवा बुमराहचाच पुढील पर्वातील कर्णधार म्हणून विचार करावा असं सुचवलं आहे. बुमराहने भारतीय संघाचं कसोटीमध्ये नेतृत्व केलेलं आहे. इंग्लंडच्या संघाविरुद्ध बुमराहने भारतीय संघाचं नेतृत्व केलेलं. तसेच त्याने आर्यलंडविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यात भारताचं नेतृत्व केलेलं. दुसरीकडे सूर्यकुमार यादवने  एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप 2023 स्पर्धेनंतर झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघाची धुरा संभाळली होती.

नक्की वाचा >> 'IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये रोहित नसणार अन् हार्दिकही'; माजी क्रिकेटर म्हणाला, 'मॅनेजमेंट..'

कर्णधार म्हणून रोहितचा विचार नाही कारण...

"सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह या दोघांपैकी एकाला संघाने कर्णधार बनवायला हवं. मी कर्णधार म्हणून रोहितचाही विचार करत नाहीये कारण सध्याची स्थिती पाहता त्यालाच संघाबरोबर राहण्याची इच्छा दिसत नाहीये," असं तिवारी म्हणाला. रोहित, पंड्याला रिटेन न करता या दोघांचा 2025 साठी MI चा कर्णधार म्हणून विचार करा, असं तिवारीने मुंबईच्या व्यवस्थापनाला सुचवलं आहे.

बुमराह आणि सूर्यकुमारची कामगिरी कशी?

बुमराहने यंदाच्या आयपीएलमध्ये 20 विकेट्स घेतल्या आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे सूर्यकुमार यादवने 345 धावा केल्या आहेत. या दोघांमध्ये मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने वेळेचे गुंतवणूक केल्यास नक्कीच हाती काहीतरी उत्तम लागेल अशी दाट शक्यता तिवारीने व्यक्त केली आहे. रोहित शर्मा पुढील पर्व मुंबईकडून नक्कीच खेळणार नाही असा विश्वास तिवारीने व्यक्त केला आहे. 

2024-05-20T03:31:38Z dg43tfdfdgfd