सबका बदला लिया...! जे रोहितला दोन वेळा जमले नाही ते श्रेयस अय्यर, गौतम गंभीर जोडीने एका झटक्यात करून दाखवले

चेन्नई: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत विजेतेपद पटकावले. चेन्नईच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या लढतीत केकेआरने एकतर्फी लढतीत हैदराबादवर ८ विकेटनी सहज विजय मिळवला. या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादला फक्त ११३ धावा करता आल्या. उत्तरादाखल केकेआरने २ विकेट आणि ५७ चेंडू राखून विजय साकारला. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वात एकतर्फी फायनल ठरली. मात्र या लढतीत केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि संघाचा मेंटर गौतम गंभीर यांनी अशी एक कामगिरी केली आहे ज्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.

आयपीएलच्या लिलावात हैदराबाद संघाने विक्रमी बोली लावत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला टीममध्ये घेतले होते. त्यानंतर हैदराबाद संघाने धमाकेदार खेळी करत प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरवली होती. अशात यावेळी कमिन्स पुन्हा एकदा बाजी मारणार असे वाटत होते. कारण कमिन्सने ऑस्ट्रेलियाला याआधी दोन मोठी विजेतेपद मिळून दिली आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले. तेव्हा कमिन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा पराभव केला होता. त्यानंतर आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये कमिन्सने पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा पराभव करुन विजेतेपद मिळवले होते.

आता आयपीएलमध्ये देखील तो विजेतेपद मिळवतो की काय असे वाटत होते. पण श्रेयस अय्यरचे नेतृत्व आणि गंभीरची रणनिती या समोर पॅट कमिन्सचे काहीच चालेल नाही. कमिन्सचे आयपीएल जेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. केकेआरने २०१२, २०१४ नंतर आता तिसरे जेतेपदावर नाव कोरले. ज्या कमिन्सचा पराभव करणे रोहित शर्माला शक्य झाले नाही ते काम अय्यर आणि गंभीर या दोन भारतीय खेळाडूंनी करून दाखवले.

आयपीएलच्या १७व्या हंगामात केकेआरने फक्त ३ लढती गमावल्या. याआधी अशी कामगिरी राजस्थान रॉयल्सने २००८ साली केली होती. तर गुजरात टायटन्स संघाने २०२२ मध्ये फक्त ४ लढती गमावल्या होत्या.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-26T19:34:35Z dg43tfdfdgfd