CSK VS GT: चेन्नईने घरी बोलवून गुजरातला दिला बेदम चोप; शिवम दुबेची झंजावाती फलंदाजी, उभा केला धावांचा डोंगर

चेन्नई: आयपीएलच्या १७ व्या हंगामातील सातवी लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघात चेपॉक मैदानावर सुरू आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघाने गुजरातच्या गोलंदाजांची बेदम धुलाई केली आणि २० षटकात ६ बाद २०६ धावा केल्या. चेन्नईकडून रचिन रविंद्र, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी दमदार फलंदाजी केली.

टॉस जिंकून गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या डावाची सुरुवात कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्र यांनी केली. पहिल्याच ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर ऋतुराजला जीवनदान मिळाले. हा निर्णय गुजरातला प्रचंड महागात पडला. चेन्नईच्या दोघा सलामीवीरांनी एकएक करून गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पहिल्या ३० चेंडूत चेन्नईने ५० धावांचा टप्पा पार केला होता.

सहाव्या षटकात चेन्नईला पहिला ध्कका बसला. आक्रमक फलंदाजी करणारा रचिन २० चेंडूत ४६ धावा करून बाद झाला. त्याने ३ षटकार आणि ६ चौकार मारले. रचिन बाद झाल्यानंतर त्याच्या जागी अजिंक्य रहाणे आला आणि सूत्रे सर्व ऋतुराजने हाती घेतली. रचिन असेपर्यंत हळू खेळणाऱ्या ऋतुराजने त्याच्यातील स्पार्क दाखवला. या जोडीने १० षटकात संघाला १०४ धावसंख्येवर पोहोचवले. ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अजिंक्य १२ धावांवर बाद झाला.

अजिंक्यच्या जागी आलेल्या शिवम दुबेची फलंदाजी पाहून रहाणेला उगाच बाद केले अशी भावना गुजरातच्या गोलंदाजांच्या मनात आली. दुबेने पहिल्या २ चेंडूवर दोन षटकार मारून आपला इरादा स्पष्ट केला. १३व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ऋतुराज ४६ धावांवर बाद झाला. विकेट पडली असली तरी दुबेवर कोणताही परिणाम झाला नाही. त्याने गोलंदाजांना चोप देणे सुरूच ठेवले होते. दुबेने फक्त २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात तो बाद झाला. दुबेने २३ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकार मारले.

चेन्नईने २० षटकात ६ बाद २०६ धावा केल्या. गुजरातकडून राशिद खानने ४ षटकात २ विकेट घेत ४९ धावा दिल्या. तर उमेश यादवने २ षटकात २७ धावा दिल्या, अन्य गोलंदाजांची देखील अशीच धुलाई झाली.

2024-03-26T15:59:49Z dg43tfdfdgfd