कुलदीपने वाचवली दिल्लीची लाज, केकेआरने पंतसेनेला घाम फोडत किती धावांत रोखले जाणून घ्या...

कोलकाता : केकेआरच्या गोलंदाजांनी यावेळी दिल्लीच्या संघाचे सुरुवातीला वस्त्रहरण केले होते. दुसऱ्या षटकापासून केकेआरने दिल्लीला धक्के द्यायला सुरुवात केली. पृथ्वी शॉपासून ते ऋषभ पंतपर्यंत एकाही फलंदाजाला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. पण यावेळी कुलदीप यादवने दिल्लीच्या संघाची लाज वाचवल्याचे पाहायला मिळाले. कुलदीपने २६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर संघासाठी सर्वाधिक ३५ धावांची खेळी साकारली. त्यामुळे दिल्लीच्या संघाला २० षटकांत ९ बाद १५३ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. दिल्लीच्या संघाने १५० धावांचा पल्ला ओलांडल्यामुळे आता त्यांना विजयाची आशा निर्माण झाली आहे.

पृथ्वी शॉ याने या सामन्यात दिल्लीच्या संघात पुनरागमन केले होते. त्यामुळे त्याच्याकडून दिल्लीला मोठ्या आशा होत्या. पण पृथ्वी यावेळी दुसऱ्याच षटकात बाद झाला आणि दिल्लीला पहिला धक्का बसला. पृथ्वीला यावेळी १३ धावाच करता आल्या. पृथ्वी बाद झाल्यावर दिल्लीचा डाव गडगडायला सुरुवात झाली. दिल्लीचे खेळाडू आक्रमक होत फटकेबाजी करत गेले, पण त्यांना आपल्या विकेट्स सांभाळता आल्या नाहीत. त्यामुळे दिल्लीची ३ बाद ३७ अशी अवस्था झाली होती. त्यामुळे कर्णधार ऋषभ पंतकडून यावेळी सर्वांनाच मोठी अपेक्षा होती. पण ऋषभ पंतने यावेळी २० चेंडूंत २७ धावा केल्या, ज्यामध्ये दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. पंत बाद झाल्यावर दिल्लीचा संघ जास्त काळ तग धरेल, असे वाटत नव्हते.

केकेआरच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला दिल्ला धक्के दिले. वैभव अरोराने यावेळी पृथ्वी शॉ आणि शाई होप यांचा काटा काढला. त्यानंतर फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने दिल्लीच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले. वरुणने प्रथम पंतला बाद करत दिल्लीच्या संघाला मोठा धक्का दिला. कारण पंत जर बाद झाला नसता तर दिल्लीचा संघ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करू शकला असता. त्यानंतर वरुणने स्ट्रीस्टीन स्टब्सला ४ आणि इम्पॅक्ट खेळाडू म्हणून संघात आलेल्या कुमार कुशाग्राला एका धावेवर बाद केले. वरुणने यावेळी ४ षटकांत फक्त १६ धावा दिल्या आणि दिल्लीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले.

दिल्लीसाठी हा सामना सर्वात महत्वाचा आहे. कारण दिल्लीने जर या सामन्यात विजय साकारला तर त्यांना प्ले ऑफच्या दिशेने ठोस पाऊल टाकता येणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-29T16:10:02Z dg43tfdfdgfd