चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार पण भारताचे सामने मात्र कुठे होणार, जाणून घ्या...

नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (PCB) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी लाहोर, कराची व रावलपिंडी या जागांची निवड केली आहे. हा प्रस्ताव त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलला (ICC) पाठविला आहे. पण भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास पाकिस्तानात जाणार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे भारताचे सामने कुठे खेळलायचे, याचा विचारही पाकिस्तानने केला आहे.

भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का ?

मार्च महिन्यात सुत्रांद्वारे असे समोर आले होते की, आयसीसी एशिया कपसारखे 'हाइब्रिड मॉडेल' वापरु शकते. आयसीसीच्या कार्यकारी बोर्डाने म्हटले होते की, जर भारत सरकार भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवणार नसेल तर, आम्ही तेथील बोर्डवर दबाव टाकू शकत नाही त्यामुळे एक वेगळा पर्याय आपल्याला शोधावा लागेल.

एशिया कपचे सामने भारताने श्रीलंकेत खेळले होते...

गेल्या वर्षी एशिया कपचे आयोजन पाकिस्तानने केले होते. तेव्हाही भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही त्यामुळे 'हाइब्रिड मॉडेल' वापरण्यात आले. भारताचे सामने श्रीलंकेत घेण्यात आले. कोलंबोमध्ये भारत व श्रीलंकेत अंतिम सामना झाला ज्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत जेतेपद आपल्या नावावर केले होते. त्यामुळे भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामनेही श्रीलंकेत खेळवले जाणार असल्याचे म्हटले जात आहे आणि त्याला पाकिस्तानची तयारी असल्याचेही समोर येत आहे.

स्पर्धेत ८ संघ होणार सहभागी..

२०१७ मध्ये इंग्लंड व वेल्समध्ये चॅम्पियन्स टॉफीचे आयोजन केले होते ज्यात पाकिस्तानने भारताला फायनलमध्ये पराभूत करत जेतेपद मिळविले होते. आयसीसीच्या जागा निरिक्षण करण्याच्या प्रकियेनंतर सामन्याचे वेळापत्रक सादर होऊ शकते. या स्पर्धेत ८ संघाचा समावेश असणार आहे.

२९ वर्षानंतर पाकिस्तानला मिळाली संधी

१९९६ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तानला पहिल्यांदा आयसीसीने आयोजनाची संधी दिली आहे. २००६ नंतर भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला नाही. दोन्ही देश एकमेकांविरुद्ध फक्त आयसीसीचे सामने खेळले आहेत. आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना ९ जूनला होणार आहे.

पुढच्या वर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात चॅम्पियन्स टॉफीचे सामने खेळले जाणार आहेत, त्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने तीन जागा निश्चित केल्या आहेत. लाहोर, कराची व रावळपिंडी जागांचा आराखडा आयसीसीला पाठवला आहे. मात्र, भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करेल की, 'हाइब्रिड मॉडल' वापरले जाणार याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही. पाकिस्तान व भारत या दोन देशातील वैमनस्य जगजाहीर आहे. भारत व पाकिस्तान सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेटप्रेमी उत्सुक असतात.

भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. कारण भारत सरकार आपल्या संघाला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी देणार नसल्याचे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-29T18:10:22Z dg43tfdfdgfd