पंजाबचा रेकॉर्ड ब्रेक विजय, आयपीएलच्या इतिहासातील केकेआरचा सर्वात मोठा पराभव

कोलकाता : क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही, या गोष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. केकेआरने २६१ धावा केल्यावर तेच हा सामना सहज जिंकतील, असे वाटले होते. पण जॉनी बेअरस्टोच्या तुफानी शतकाच्या जोरावर पंजाबने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात विजय साकारला. आतापर्यंत आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने २२४ धावांचा पाठलाग करताना विजय साकारला होता. पण त्यांचा हा विक्रम आता पंजाबच्या संघाने मोडीत काढला आहे. केकेआरने पंजाबपुढे विजयासाठी २६२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा दमदार पाठलाग करत पंजाबच्या संघाने ८ विकेट्स राखत विजय मिळवला आणि आयपीएलमध्ये इतिहास रचला. जॉनी यावेळी पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. जॉनीने यावेळी ४८ चेंडूंत नाबाद १०८ धावांची तुफानी खेळी साकारली, यामध्ये ८ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. जॉनीला यावेळी शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांनी अर्धशतके झळकावत सुयोग्य साथ दिली.

पंजाबच्या संघाचा एवढा आक्रमक पवित्रा हा पहिल्यांदाच या आयपीएलमध्ये पाहायला मिळाला. केकेआरने २६२ धावांचे आव्हान पंजाबपुढे ठेवले होते. पण पंजाबला यावेळी जॉनी बेअरस्टो आणि प्रभसिमरन सिंग यांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली. पंजाबच्या संघाने यावेळी फक्त ३.३ चेंडूंतच अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे पंजाबला फक्त २१ चेंडूंत अर्धशतकी सलामी मिळाली. यावेळी प्रभसिरन सिंग हा भन्नाट फॉर्मात होता. कारण त्याने फक्त १८ चेंडूंत आपले अर्धशतक झळकावले आणि संघाला झोकात सुरुवात करून दिली. त्याने २० चेंडूंत ४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ५४ धावांची खेळी साकारत आपली जबाबदारी चोख पार पडली. त्यावेळी पंजाबची ६ षटकांत १ बाद ९३ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर संघाची सर्व जबाबदारी उचलली जॉनी बेअरस्टोने.

पंजाबने यावेळी ७.२ षटकांत आपले शतक साजरे केले, ज्यामध्ये जॉनीचा मोठा वाटा होता. कारण जॉनीने यावेळी २३ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर आपेल अर्धशतक पूर्ण केले. पंजाबने आपला १५० धावांचा पल्ला ११ व्य षटकात पार केला आणि त्यामुळेच त्यांच्या विजयाची शक्यता वाढली होती. पंजाबने १५ षटकांत २०१ धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे त्यांना विजयाची आशा दिसत होती. कारण पाच षटकांमध्ये पंजाबच्या संघाला ६१ धावांची गरज होती.

तत्पूर्वी, केकेआरच्या दोन्ही सलामीवीरांनी धडाकेबाज फटकेबाजी केली आणि संघाला धावांचा डोंगर उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. ११ व्या षटकात केकेआरच्या संघाला पहिला धक्का बसला. राहुल चहरने सुनील नरिनला बाद केले आणि पंजाबला पहिले यश मिळवून दिले. नरिनने यावेळी ३२ चेडूंत ९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

नरिन बाद झाल्यावर सॉल्टही जास्त काळ टिकला नाही. सॉल्टने यावेळी ६ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर ३७ चेंडूंत ७५ धावा कुटल्या. त्यामुळेच केकेआरच्या संघाला यावेळी २६१ धावांपर्यंत मजल मारता आली होती.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-26T18:13:30Z dg43tfdfdgfd