मुंबई इंडियन्स संघाबाबत आली मोठी अपडेट, नव्या खेळाडूला टीममध्ये घेतले; गुजरातने शमीच्या जागी कोणाला संधी दिली?

नवी दिल्ली: आयपीएल २०२४ला सुरुवात होण्याच्या काही तास आधी मोठी अपडेट समोर येत आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघात बदल झाले आहेत. या दोन्ही संघांनी जखमी खेळाडूंच्या बदली कोणाला संघात घेणार हे जाहीर केले आहे.

गुजरात टायटन्स संघाने जलद गोलंदाज मोहम्मद शमीच्या जागी संदीप वॉरियर याचा संघात समावेश केला आहे. शमीला वर्ल्डकप २०२३ मध्ये दुखापत झाली होती, त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानातून दूर झाला. काही दिवसांपूर्वी त्याच्या पायावर सर्जरी देखील झाली होती. यामुळे तो आयपीएल २०२४चा संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. त्याच बरोबर जून महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२०वर्ल्डकपमधून शमी बाहेर झाला आहे.

शमीच्या जागी गुजरात संघाने संदीप वॉरियरचा समावेश केला आहे. संदीपने २०२१ साली भारतीय संघाकडून टी-२० मध्ये पदार्पण केले होते. संदीप देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळतो. याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे. अर्थात या तिनही संघाकडून त्याला फार संधी मिळू शकली नाही. आता गुजरातकडून तो किती चमकतो हे पहावे लागले.

मुंबई इंडियन्सला मिळाली ज्युनिअर रबाडा

गुजरात सोबत मुंबई इंडियन्सने देखील जखमी खेळाडूच्या जागी नव्या खेळाडूचा संघात समावेश केला आहे. मुंबई संघात असलेल्या दिलशान मधुशंकाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर झालाय. त्याच्या जागी मुंबईने दक्षिण आफ्रिकेकडून १९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या क्वेना मफाका याला संधी दिली आहे.

क्वेना मफाकाने १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये वेगवान गोलंदाजीद्वारे कमाल करून दाखवली होती. त्याला आफ्रिकेचा ज्युनिअर रबाडा देखील म्हटले जाते. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची पहिली मॅच गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विशेष म्हणजे गेली दोन वर्ष गुजरातचे नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या यावेळी मुंबई इंडियन्स संघात आला असून तो रोहित शर्माच्या जागी नेतृत्व करणार आहे.

2024-03-20T17:01:21Z dg43tfdfdgfd