सलग ३ पराभवानंतर हार्दिक पंड्याचा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मेसेज; या संघाबद्दल तुम्हाला...

मुंबई: आयपीएल २०२४मध्ये सलग तिसऱ्या पराभव झालेल्या मुंबई इंडियन्सचा संघ गुणतक्त्यात अखेरच्या क्रमांकावर आहे. सोमवारी मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने ६ विकेटनी पराभूत केले.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला एकाही लढतीत विजय मिळवता आलेला नाही. आधीच रोहित शर्माच्या जागी हार्दिकची कर्णधार म्हणून निवड झाल्याने मुंबईचे चाहते नाराज आहेत. त्यात मैदानावर संघाची कामगिरी खराब होत आहे.

काल सोमवारी झालेल्या लढतीतील पराभवानंतर हार्दिक पंड्या भावनिक झाला आणि त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक मेसेज पोस्ट केला. एक्सवर हार्दिकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, या संघाबाबत तुम्हाला एक गोष्ट माहिती असली पाहिजे की, आपण कधीच हार मानत नाही. आपण लढत राहतो आणि पुढे चालत राहतो. हार्दिकची ही पोस्ट अशा चाहत्यांसाठी आहे ज्यांनी या वर्षी मुंबई इंडियन्सच्या विजयाची आशा सोडली आहे.

पराभवावर काय म्हणाला हार्दिक?

राजस्थानविरुद्ध विकेट गमावणे हेच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. आमच्यासाठी आजची रात्र कठीण होती. आम्हाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. आम्ही १५० ते १६० धावसंख्या करू शकलो असतो. पम माझी विकेट पडली आणि त्यांना कमबॅकची संधी मिळाली. मला काही तरी चांगले करायचे होते. खेळपट्टी आम्हाला अपेक्षित अशी नव्हती.

ही बाब गोष्टी योग्य करण्याची आहे. अनेकदा चांगले निकाल मिळतात तर अनेकदा मिळत नाहीत. संघ म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही खुप चांगली कामगिरी करू शकतो. थोडी शिस्त आणि हिम्मत दाखवण्याची गरज आहे, असे हार्दिक म्हणाला.

आयपीएलच्या १७व्या हंगामाची सुरूवात मुंबईसाठी खराब झाली आहे. पहिल्या ३ लढतीत पराभव झाल्याने ते गुणतक्त्यात शेवटच्या क्रमांकावर आहेत. स्पर्धेतील मुंबई हा एकमेव संघ आहे ज्यांना अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सकडून ६ धावांनी, दुसऱ्या लढतीत सनरायझर्स हैदराबादकडून ३१ धावांनी तर राजस्थान रॉयल्सकडून ६ विकेटनी मुंबईचा पराभव झाला. मुंबईची चौथी लढत ७ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-02T15:46:07Z dg43tfdfdgfd