हार्दिक पंड्याला कोणी केलं मुंबई इंडियन्सचा कर्णधार, सौरव गांगुलीने खरं तेच सांगितलं...

मुंबई : हार्दिक पंड्याला या वर्षीच्या आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळाले. पण यावेळी हार्दिक पंड्याला कर्णधार केलं तरी कोणी, याबाबत भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्टपणे सर्व काही सांगितले आहे.

हार्दिक पंड्याची हुर्यो कशाला उडवली जात आहे. मुंबईकरांच्या लाडक्या असलेल्या रोहित शर्माऐवजी हार्दिकची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, त्यात हार्दिकची चुक काय आहे, त्याला लक्ष्य करण्याचे कारणच काय अशी विचारणा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी केली.

मुंबई इंडियन्सने या मोसमासाठी हार्दिककडे संघाची धुरा सोपवली आहे. तेव्हापासून त्याला लक्ष्य करण्यात येत आहे. प्रत्येक सामन्याच्या वेळी त्याची हुर्यो उडवली जात आहे. त्यास अहमदाबादला मुंबईच्या पहिल्या सामन्यापासून सुरुवात झाली. हेच हैदराबाद आणि मुंबईतही झाले. 'हार्दिकला का लक्ष्य केले जात आहे. हे चुकीचे आहे. फ्रँचाइजीने त्याची कर्णधारपदी निवड केली आहे. तुम्ही भारतीय संघाचे कर्णधार असा किंवा एखाद्या राज्य संघाचे किंवा फ्रँचाइजी संघाचे, तुमची नियुक्ती केली जात आहे. हेच हार्दिकबाबत घडले आहे. रोहित खूप उच्च दर्जाचा खेळाडू; तसेच कर्णधार आहे. मात्र, त्याच्याऐवजी हार्दिकची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची कर्णधारपदी नियुक्ती झाली, ही त्याची चूक नाही. आपण सर्वांनी हे समजून घ्यायला हवे,' असे गांगुलींनी सांगितले.

ऋषभ पंतने आयपीएलमधील दोन सामन्यांत अर्धशतके केली आहेत. त्यामुळे तो भारतीय संघातील पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे, असे मत काही क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केले; मात्र भारतीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष गांगुली याच्याशी पूर्ण सहमत नाहीत. 'अजून काही सामन्यानंतर याबाबत भाष्य करणे योग्य होईल. तो फलंदाजी आणि यष्टीरक्षण नक्कीच चांगल्या प्रकारे करीत आहे. त्याला छान सूर गवसला आहे. त्याने गेल्या दोन सामन्यात सुरेख खेळी केली. मात्र, अजून एका आठवड्यानंतर त्याच्याबाबत भाष्य करणे योग्य होईल. निवड समितीचे काय मत आहे, ते जास्त मोलाचे आहे. तो तंदुरुस्त आहे, एवढे मात्र नक्की,' असे गांगुली यांनी सांगितले. आयपीएलमधील धावांच्या क्रमवारीत सध्या पंत चौथ्या क्रमांकावर आहे.

सौरव गांगुली यांनी यावेळी आपली स्पष्ट मतं व्यक्त केली आहेत. हार्दिक पंड्या असो किंवा ऋषभ पंत, गांगुली यांनी या दोघांबाबत आपली मतं व्यक्त केली आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-07T15:27:25Z dg43tfdfdgfd