अब तो भाई चल पडी... भारतीय संघात निवड होताच सरफराज खानची पहिली प्रतिक्रिया; शेअर केली खास पोस्ट

नवी दिल्ली: भारतात सुरू असलेल्या इंग्लंडविरूध्दच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. या संघात अथक प्रयत्नानंतर सरफराज खानला संधी मिळाली आहे. सरफराज खानने भारतासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक वर्षे अप्रतिम कामगिरी केली. अनेकदा त्याला टीम इंडियात निवडण्याची मागणी केली जात होती. पण आता प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर या खेळाडूने टीम इंडियात प्रवेश केला आहे. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाले आहेत. अशा स्थितीत बदली म्हणून सरफराज खानची निवड करण्यात आली आहे.

सरफराज खानची पहिली प्रतिक्रिया

सरफराज खानने इंस्टाग्रामवर काही स्टोरी शेअर केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने त्याला संघात निवडीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्याची स्टोरी शेअर केली. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आणि चक दे इंडियाच्या बादल पे पाँव है, हे चक दे इंडिया चित्रपटातील या प्रसिद्ध गाण्यासोबत एक स्टोरी पोस्ट केली. या इंस्टा स्टोरीमध्ये सरफराजने त्याच्या वडिलांसोबतच एक खास फोटो पोस्ट करत चक दे इंडिया या गाण्यासोबत पोस्ट केला आहे. सरफराजच्या क्रिकेट करियरमध्ये त्याच्या वडिलांची मुख्य आणि मोठी भूमिका राहिली आहे.

याशिवाय, सरफराजने टीम इंडियाच्या नवीन स्क्वॉडच्या नावांचा फोटो शेअर केला आणि भारतीय तिरंगा आणि हार्ट इमोजीसह पुढील स्टोरी पोस्ट केली. सरफराज खानचे वडील नौशाद खान यांनीही व्हिडिओ शेअर करून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे सरफराजला अलीकडेच बीसीसीआयच्या अवॉर्ड शोमध्ये सर्वोत्कृष्ट देशांतर्गत क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला होता.

पदार्पणात मिळू शकते संधी

सरफराज खानच्या निवडीवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आता त्याच्या निवडीनंतर तो दुसऱ्या कसोटीत पदार्पण करू शकतो हे जवळपास निश्चित झाले आहे. कारण केएल राहुल आता संघाबाहेर आहे. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नसेल तर त्याच्या जागी सरफराजचा समावेश केला जाऊ शकतो. मात्र, यामध्ये रजत पाटीदारही त्याला स्पर्धा देण्यासाठी आहे. आता या दोघांपैकी एकाला संधी मिळते की दोन्ही खेळाडू पदार्पण करू शकतात हे पाहायचे आहे.

2024-01-30T04:22:56Z dg43tfdfdgfd