मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवर अशी वेळ कधीच आली नाही; हेड,अभिषेक, क्लासेनची बॅट तळपली-झाली विक्रमी अर्धशतकं

हैदराबाद: आयपीएल २०२४मध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढत सुरू आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईला इतका महाग पडले असे कोणालाही वाटले नाही. मुंबईविरुद्ध हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या २७७ उभी केली.

हैदराबादच्या डावाची सुरुवात मयांक अग्रवाल आणि ट्रेव्हिस हेड यांनी केली. या दोघांनी पहिल्या ओव्हरपासून मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. पाचव्या षटकात सलामीवीर मयांक अग्रवालला हार्दिकने ११ धावांवर माघारी पाठवले आणि त्यानंतर जे काही झाले ते मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखे ठरले. हेडच्या जोडीला आलेल्या अभिषेक शर्माने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.

सहाव्या षटकात हेडने फक्त १८ चेंडू अर्थशतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासातील हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. तर हैदराबाद संघाकडूनचे सर्वात वेगवान ५० धावा ठरल्या. याआधी हा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता, त्याने २०१५ साली २० चेंडूत ५० धावा केल्या होत्या. अर्धशतकानंतर देखील हेडची धुलाई सुरू होती. पण तो २५ चेंडूत ६२ धावा करून बाद झाला. हेडने हैदराबाद संघाकडून पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने २५ चेंडूत ६२ धावा केल्या.

हेड बाद झाल्याचा आनंद मुंबई इंडियन्स साजरा करत असताना अभिषेक शर्माची बॅट तळपतच होती. हेडने १८ चेंडूत अर्धशतक केले असता अभिषेकने काही मिनिटात त्याचा विक्रम मोडला आणि फक्त १६ चेंडूत ५० धावा केल्या. अर्धशतक झाल्यानंतर तो लगेच बाद झाला. अभिषेक शर्मानंतर हेनरिक क्लासेन मैदानावर आला आणि त्याने देखील तेच केले जे हेड आणि शर्मा करत होते. क्लासेनने २३ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या.

या तिघांची फलंदाजी इतकी घातक होती की मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना चेंडू टाकू तरी कुठे असे झाले होते.

मुंबईच्या गोलंदाजांची अवस्था

क्वेना मफाका- ४ षटके ६६ धावा

हार्दिक पंड्या- ४ षटके ४६ धावा, १ विकेट

जसप्रीत बुमराह- ४ षटके ३६ धावा

जेराल्ड कोएत्झी- ४ षटके ५७ धावा, १ विकेट

पियुष चावला- २ षटके ३४ धावा, १ विकेट

शस्म मुलाणी - २ षटके ३३ धावा

2024-03-27T17:32:17Z dg43tfdfdgfd